शिवाजीराजे व मुघल -
शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्या व्यापार्यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले.
यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला. दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.
Comments