शिवाजीराजे व मुघल -
शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्या व्यापार्यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण...